बेळगाव : वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. परिस्थिती कशीही असो, जनमाणसापर्यंत वृत्तपत्र वेळेत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करीत असतात, असे भाजप युवा नेते आणि विमल फौंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष किरण जाधव म्हणाले.
बेळगाव वृत्तपत्र विक्रेते सामाजिक व सांस्कृतिक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा वडगाव मधील अनुसया मंगल कार्यालयात आयोजिण्यात आली होती. या कार्यक्रमात किरण जाधव यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
सुख असो वा दुःख, कोणत्याही प्रकारची अडचण असली, तरी वृत्तपत्र विक्रेते ग्राहकापर्यंत वर्तमानपत्र वेळेत पोहोचवितात. त्यांच्या या कार्याचे कौतुक होणे गरजेचे आहे, असे सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव म्हणाले.
असंघटित कामगारांसाठी अनेक शासकीय सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, या योजनांचा लाभ वृत्तपत्र विक्रेते घेत नाहीत. आगामी काळात वृत्तपत्र विक्रेत्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शहर आणि परिसरात 300 हून अधिक वृत्तपत्र विक्रेते आहेत. या विक्रेत्यांना आरोग्य सुविधांसह इतर प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासह वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हितोन्नतीसाठी सरकार दरबारी आपण प्रयत्न करणार असल्याचे किरण जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.
प्रारंभी, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. वृत्तपत्र सोसायटीचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष दीपक राजगोळकर यांनी प्रास्ताविक भाषणात सोसायटीतर्फे वर्षभर हाती घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सुभाष गोरे तसेच वृत्तपत्र विक्रीसाठी आपल्या वडिलांना मदत करणाऱ्या पूजा पुजारी, श्रुती भडदे, प्रांजल शहापूरकर, निश्मिता नाईक, श्रेया इंदुलकर यांचा सत्कार करण्यात आला. महादेव पाटील यांनी आभार मानले.
ऑल इंडिया न्यूज पेपर असोसिएशनचे सदस्य प्रताप भोसले, राजू मुचंडी, उपाध्यक्ष श्रीकांत नेवगी, सचिव राजू भोसले, खजिनदार संजय घोरपडे, सतीश नाईक आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta