अमेरिकेचा मल्ल प्रथमच बेळगावात येणार
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे बुधवारी (दि. १२) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. आनंदवाडी आखाड्यात होणाऱ्या य कुस्ती मैदानाची उत्सुकता कुस्तीप्रेमींमध्ये वाढली आहे.
या कुस्ती मैदानात अमेरिकेचा मल्ल प्रथमच बेळगावात येणार आहे. याशिवाय इराणचे तीन मल्ल भारतातील अव्वल पैलवानांशी भिडणार आहेत. कर्नाटक केसरी कार्तिक काटे प्रथमच इराणच्या मल्लाशी लढणार आहे. बेळगाव केसरी, बेळगाव मल्ल सम्राट किताब कोण पटकावणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या मैदानात मनोरंजनाच्या कुस्तीसाठी नेपाळचा देवा थापा दुसऱ्यांदा बेळगावात येणार असल्याने या कुस्तीविषयी उत्सुकता आहे. आनंदवाडी आखाड्याची व्यवस्था, प्रेक्षकांची बैठक व्यवस्था, मान्यवरांसाठी व्यासपीठ, प्रकाशयोजना, ध्वनी यंत्रणा आदींचे काम सुरू झाले आहे. कुस्ती संघटनेचे सदस्य तयारी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. या मैदानात पहिल्यांदाच महिला कुस्तीचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यात कर्नाटक चॅम्पियन स्वाती पाटील कडोली या हरियाणा चॅम्पियन हिमानी यांच्याशी लढणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिर्जे, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव जोतिबा हुंदरे, खजिनदार ए. जी. मंतुर्गी, चेतन बुध्याण्णवर, माजी अध्यक्ष बाळाराम पाटील, विनायक मुतगेकर, बाहुबली पाटील, अभिजित पाटील, मंथन हणमशेट आदी कुस्ती मैदानाचे नियोजन करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta