बेळगाव : युक्रेनमध्ये अजूनही 17 वैद्यकीय विद्यार्थी अडकून आहेत असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.
बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्पष्ट केले की, बेळगाव येथील एकूण 19 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यापैकी दोन विद्यार्थी सुखरूप परतले आहेत, तर उर्वरित 17 विद्यार्थ्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मी तहसीलदारांना संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून त्यांच्यात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापर्यंत 12 विद्यार्थ्यांच्या पालकांची तहसीलदारांनी भेट घेतली आहे. मी काही पालकांनाही भेटणार आहे अशी माहिती हिरेमठ यांनी दिली.
स्मार्ट सिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी आणि सहाय्यक आयुक्त रवी करलिंगण्णावर हे नोडल अधिकारी म्हणून गेल्या तीन दिवसांपासून मुंबई विमानतळावर असून विद्यार्थ्यांशी संबंधित प्रत्येक घडामोडीचा अहवाल देत असल्याचे त्यांनी सांगितले.
