![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/03/044-300x145.jpg)
निपाणी : बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणीमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या विज्ञान उपकरणांचे सादरीकरण केले.
विज्ञानाचा उपयोग भावी काळात विविध क्षेत्रात जीवन अधिक सुखकर कसे होईल, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध मॉडेल्स या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. आधुनिक शेती, सौर उर्जा, पवन उर्जा आदी घटकातून मानवाचे जीवन अजून कसे सुखकर होईल याचे काल्पनिक दर्शन विद्यार्थ्यांच्या मॉडेल्समधून दिसत होते. रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर डिस्पेन्सर, मोटर बोट, पवनचक्की, ज्वालामुखी, स्मार्ट सिटी, ड्रिप इरिगेशन, रोप वे, सोलार सिस्टीम, हायड्रॉलिक सिस्टीम आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी मॉडेल्स बनवली होती.
प्रथमेश मगदूम, प्रज्वल कुंभार, भूमी शिंदे, प्रणव बाबन्नावर, पार्थ तावदारे, सर्वेश खोत, जान्हवी पाटील, सानिका पाटील, तुषार पाटील, ओम मगदूम, अथर्व चौगले, कल्पना लोहार आदी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात भाग घेतला. संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी प्रदर्शनास भेट देऊन मुलांचे कौतुक केले. यावेळी प्राचार्या दीपाली जोशी, वर्षा केनवडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहिस्ता सय्यद, वैशाली देशमाने, स्वाती चव्हाण, सुभाष इंगळे यांनी परिश्रम घेतले.