बेळगाव : मंगळवारी संध्याकाळपासून बेळगाव शहरात पावसाच्या सरी बरसल्या. काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना वळीवाच्या पावसाने गारवा अनुभवायला मिळाला. आज सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारनंतर जोरात वारा वाहू लागला आणि संध्याकाळनंतर पावसाच्या हलक्या सरींनी सुरवात झाली. वाढती उष्णता आणि तीव्र पाणी टंचाई पाहता बेळगावकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अवकाळी पावसाचा जांबोटी भागाला तडाखा
आज संध्याकाळ पासूनच खानापूर तालुक्यात वळीवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्यामुळे दिलासा मिळाला असला तरी काजू उत्पादक शेतकऱ्यांचे आणि वीट उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस इतका मोठा होता की वाहनचालकांना वाहने चालविताना अडथळा येत होता. त्यातच जांबोटी भागात रस्त्यावर झाडांच्या लहानमोठ्या फांद्या तुटून पडल्या होत्या. आधीच रस्ता खराब आहे त्यात पडणारा पाऊस त्यामुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण झाला.