खानापूर : खानापूर तालुक्यातील निट्टूर ग्रामपंचायतचे संगणक (डाटा) ऑपरेटर संजय कोळी (वय 45 वर्षे) यांनी आज बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी आपल्या नागुर्डा गावातील शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना आज बुधवारी दहाच्या दरम्यान उघडकीस आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय कोळी हे निट्टूर ग्रामपंचायतमध्ये 1997 पासून संगणक डाटा ऑपरेटर तसेच लिपिकचे काम सुद्धा करत होते. नेहमीप्रमाणे आज बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान आपल्या घरातील लोकांना शेताकडे जाऊन येतो असे सांगून गेले होते. परंतु बराच उशीर झाला तरी संजय हा घरी परतला नाही त्यामुळे त्याच्या घरच्या लोकांनी शेताकडे जाऊन पाहिले असता संजयने झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. लागलीच याबाबत खानापूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूरच्या सरकारी दवाखान्यात आणला आहे. मात्र आत्महत्येचे निश्चित कारण अजून समजू शकले नाही. पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत.
संजय यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.