बेळगाव : १०० दिवस शासकीय नियमांनुसार काम द्या आणि त्यासाठी योग्य त्या भत्त्यांची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी आज कंग्राळी बी.के. येथील नरेगा ग्रामीण कामगारांनी बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले.
ग्रामीण शेतमजूर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. नरेंगा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रोजगार हमीच्या कामाबाबत तक्रारी असल्याने कामगारांनी आवाज उठवत आंदोलन केले. कंग्राळी बी.के. ग्रामपंचायतीकडे ५० दिवसांच्या कामासाठी अनेकदा अर्ज करूनही आम्हाला एनएमआर अंतर्गत काम दिलं जात नाही. नरेगा कायद्याअंतर्गत कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. ६० टक्क्यांहून अधिक महिला रोजगार हमी योजनेत नोंदणी असतानाही रोजगारासाठी वणवण फिरावी लागत आहे. बेरोजगारी भत्ताही दिला जात नाही. आम्हाला १०० दिवस हमी असलेले काम मिळालेच पाहिजे, अशी मागणी विवेकानंद हिरेमठ यांनी केली. आम्ही दुसऱ्या गावांमध्येही कामासाठी तयार आहोत. आम्हाला १०० दिवसांचा रोजगार मिळायलाच हवा. मागच्या वेळेसही पूर्ण १०० दिवस काम मिळाले नाही. मिळालेल्या कामासाठी भत्ते देखील नियमांप्रमाणे मिळालेले नाहीत. कामगारांना स्वतः काम शोधून घ्यावे लागते ही परिस्थिती चुकीची आहे, असे पद्मा बसरिकट्टी यांनी सांगितलं. या आंदोलनात कंग्राळी बी.के. येथील नरेगा कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.