बेळगाव : बेळगावात यंदा बसव जयंतीचे आयोजन एका वैश्विक उद्देशाने, शांततेचा संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने करण्यात येणार आहे. सर्व बसवपंथीय संघटनांनी एकमताने ठरवले असून, ४ मे रोजीच्या मिरवणुकीत केवळ एकच चित्ररथ सहभागी केला जाणार आहे.आज कन्नड साहित्य भवन, बेळगाव येथे झालेल्या पूर्वसभेत हा निर्णय घेण्यात आला.
या वेळी जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी सांगितले की, जगज्योती बसवेश्वर यांची जयंती यंदा सुमारे १५ बसव अनुयायी संघटनांच्या एकत्रित प्रयत्नातून अत्यंत भव्य पद्धतीने साजरी होणार आहे. २७ एप्रिल रोजी बेळगावातील बसवेश्वर चौकात, विविध मठांचे अधिपती व मान्यवरांच्या उपस्थितीत बसवेश्वर मूर्ती पूजनाने षट्स्थळ ध्वजारोहणाने अधिकृत कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर एक भव्य बाईक रॅली काढण्यात येणार असून, सदर रॅली अनेक भागांतून फिरून रामतीर्थनगर येथे समाप्त होईल. कार्यक्रमाच्या वैशिष्ट्यांबाबत ईरण्णा देयण्णावर यांनी सांगितले की, दरवर्षी वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळी रूपक वाहने सादर केली जात. मात्र यंदा सर्व संघटना एकत्र येऊन एकाच कल्पनेवर आधारित भव्य चित्ररथ घेऊन मिरवणूक सजवली जाईल. देश व परदेशातील अस्थिर घटनांच्या पार्श्वभूमीवर, हा सोहळा शांततेचा संदेश घेऊन येणार आहे.या मिरवणुकीत केवळ लिंगायत समाजच नव्हे, तर मराठा समाजासह विविध जातीधर्मातील लोकांनी सहभागी होऊन हा सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी बेळगावकरांना केले. यावेळी रत्नक्का बेल्लद, रमेश कळसण्णावर, शंकर गुडस, रमेश कुडची, नगरसेवक राजशेखर ढोणी, शंकर पाटील बागी, सतीश पाटील, किरण अंगडी, ए.वाय. बेण्डीगेरी, माविनकट्टी, एन.एम. बाळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta