
बेळगाव : बेळगाव जिल्हा परिषदेने यंदा विक्रमी 110 कोटी रुपयांचे करसंकलन केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. पत्रकार संघाच्या संवाद कार्यक्रमात त्यांनी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, खर्च नियंत्रण आणि नवीन प्रकल्पांविषयी माहिती दिली.
बेळगाव पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या संवाद कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी यंदा जिल्हा परिषदेने विक्रमी 110 कोटी रुपयांचे करसंकलन केल्याचे सांगितले. सांबरा विमानतळ प्राधिकरणाकडून बकाया कर वसूल करण्यात आला असून, दरवर्षी 45 लाख रुपये कर निश्चित करण्यात आला आहे. ही वसुली यशस्वीपणे करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कामगार हमी योजनेसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात 500 ग्रामपंचायती असून, मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आर्थिक सक्षमीकरण झाले असून, स्थानिकांना रोजगारही मिळतो आहे. मनरेगाच्या अंतर्गत स्त्री-पुरुष कामगारांना समान वेतन दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन प्रकल्प आणि खर्चातील बचतीसंदर्भात बोलताना शिंदे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 34 ग्रामपंचायतींमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) राबवण्यात येत असून, प्रत्येक तालुक्यातील दोन गावे यासाठी निवडण्यात आली आहेत. याशिवाय, यंदाच्या आर्थिक वर्षात विद्युत खर्चासह इतर खर्चांवर नियंत्रण ठेवून एकूण 13 कोटी रुपयांची बचत करण्यात आली आहे.
कार्यक्रमावेळी पत्रकार संघाचे विलास जोशी, रवी उप्पार, मल्लिकार्जुन मुगळी, सुनील राजगोळकर, श्रीशैल मठद, श्रीकांत, मंजू, कीर्ती कासरगोड आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta