
बेळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पहाटेपासून कार्यरत करणाऱ्या महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून कर्मचाऱ्यानी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी महापौर सरिता पाटील यांनी केले.
खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भारतनगर येथील नेताजी सांस्कृतिक भवन येथे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी माजी महापौर पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, स्वछता निरीक्षक शिल्पा कुंभार, संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव, माजी अध्यक्ष पी. जे. घाडी, सुहास शहापुरकर, विनायक घोडेकर यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पाटील यांनी खानापूर तालुका रहिवासी संघटनेने स्वच्छता कर्मचार्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष देणे गरजेचे असून कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.
नगरसेवक रवी साळुंखे यांनी महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत महापालिकेत आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे सांगितले.
माजी अध्यक्ष गुरव यांनी दरवर्षी संघटनेतर्फे विविध भागातील स्वच्छताकर्मचार्यांचा सन्मान केला जात आहे. कोरोना काळातही संघटनेने अनेक गरजूंना मदत करण्यात आली असे मत व्यक्त केले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पी. जे. घाडी, विनायक घोडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
सुरेश कल्लेकर यांनी प्रास्ताविक करताना खानापूर तालुका रहिवासी संघटनेतर्फे विविध उपक्रम राबवले जात असून कोरोना काळात अनेकांना मदत करण्यात आली असे सांगितले.
मिलिंद देसाई यांनी सूत्रसंचालन तर परशराम कोळेकर यांनी आभार मानले. नामदेव कोळेकर, भरत नांदवडेकर, प्रतीक गुरव, संजय पाटील, रोहित भाकोजी, किरण हुद्दार, रूपा नावगेकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta