Sunday , December 14 2025
Breaking News

आयपीएल खेळण्याचे स्वप्न भंगले : इन्स्टाग्रामवरील एका मेसेजमुळे तरुण क्रिकेटपटूला २४ लाखाचा गंडा

Spread the love

 

बेळगाव : क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका निष्पाप तरुणाला इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल २४ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावचा राकेश येदुरे (१९) हा उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. राज्यस्तरीय सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि आयपीएलमध्ये खेळण्याचे त्याचे मोठे स्वप्न होते. गेल्या २०२४ च्या मे महिन्यात हैदराबादमध्ये झालेल्या एका राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर, चार महिन्यांनी राकेशला इन्स्टाग्रामवर ‘Sushant_srivastava1’ नावाच्या अकाउंटवरून एक मेसेज आला. या मेसेजमध्ये त्याला राजस्थान रॉयल्स संघात निवड करण्याची आणि त्यासाठी एक अर्ज भरून २ हजार रुपये पाठवण्याची सूचना केली होती.

इन्स्टाग्रामवर आलेल्या एका मेसेजमुळे हा तरुण आर्थिक अडचणीत सापडला असून, त्याच्या कुटुंबावरही संकट कोसळले आहे. या मेसेजवर विश्वास ठेवून राकेशने पैसे पाठवण्यास सुरुवात केली. भामट्यांनी त्याला प्रत्येक सामन्यासाठी ४० हजार रुपये आणि एकूण ८ लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवले. २२ डिसेंबर २०२४ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत राकेशकडून ऑनलाइन माध्यमातून २३ लाख ५३ हजार ५५० रुपये उकळण्यात आले. इतके पैसे देऊनही राकेशची ना राजस्थान संघात निवड झाली, ना त्याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली.या घटनेमुळे राकेश आणि त्याचे कुटुंब पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले आहे. राकेशचे वडील केएसआरटीसीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. अत्यंत हलाखीची परिस्थिती असूनही, मुलाच्या स्वप्नांसाठी त्यांनी कष्टाने जमवलेले पैसे फसवणूक करणाऱ्यांना दिले.

या प्रकरणी बेळगावचे एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात निष्पाप तरुणच जास्त बळी पडत आहेत. ऑनलाइन येणाऱ्या अशा फसव्या संदेशांना कोणीही बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. सध्या या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, जिल्हा सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *