
बेळगाव : महानगरपालिकेच्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चुकीची माहिती देऊन महापालिकेची प्रतिमा खराब करू नये, तसेच त्यांच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढावा, असे निर्देश बेळगावचे महापौर मंगेश पवार यांनी दिले.
आज बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल विभागाची बैठक महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी आणि विरोधी पक्षनेते मुजम्मिल ढोणी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीच्या कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सदस्यांनी कर संकलन आणि चलन भरणा करताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काही नगरसेवकांनी, कार्यालयात गेल्यानंतरही त्यांच्याशी योग्य वर्तन केले जात नसल्याची तक्रार केली.
यावर महापौर मंगेश पवार यांनी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणे योग्य नसल्याचे सांगितले. यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा खराब होत असल्याचे ते म्हणाले. कर्मचाऱ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी त्या आपल्या निदर्शनास आणून द्याव्यात, असेही महापौरांनी सांगितले.
बेळगाव महानगरपालिकेचे भूभाड्याचे चलन हाताने न देता क्यूआर कोडद्वारे देण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय लीजसह इतर महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा झाली. या बैठकीला नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta