
बेळगाव : कांही दिवसापूर्वी समाजकंटकांनी विटंबना केलेल्या सदाशिवनगर बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला सकल मराठा समाज बेळगाव व मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
15 मे 2022 रोजी बेळगावात होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण बेंगळूर येथील मराठा समाजाचे मठाधिश श्री मंजुनाथ स्वामी यांना देण्यासाठी गेलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्फूर्तीस्थळाला भेट देऊन पुष्पमाला अर्पण केली, आणि जय भवानी जय शिवाजी या घोषणेने परिसर दणाणून सोडला. अमाप उत्साहात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करतेवेळी मराठा समाजाचे विकास कार्य करण्याचे संकल्प करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना किरण जाधव म्हणाले, मराठा समाजातील लोकांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी एकत्रपणाने संघर्ष केला पाहिजे. एकंदर समाज एकत्रित करण्याची सुरुवात समाजासाठी आशादायक आहे. याप्रसंगी इतरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी बेंगळूर श्री छत्रपती शिवाजी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. गणेश केसरकर, कलमेश शिंदे, चंद्रकांत कोंडूस्कर, सुनील जाधव, सागर पाटील, दत्ता जाधव, संजय कडोलकर, रमेश रायजादे, सुहास हुद्दार, केदारी करडी, विशाल कंग्राळकर अन्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta