
बेळगाव : सीमाप्रश्न संपलेला अध्याय आहे. स्थानिक नेते केवळ राजकारण करण्यासाठी सीमाप्रश्न जिवंत ठेवला आहे, स्थानिक जनतेला फक्त विकास पाहिजे, असे हास्यास्पद विधान करून राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी मराठी भाषिकांना डिवचले आहे. त्यामुळे इराण्णा कडाडी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, सीमाप्रश्न हा संपलेला विषय आहे. यावर आणखी चर्चा करण्याची गरज नाही. सीमाप्रश्न काही राजकीय पक्षांकडून जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न असतो मात्र तेही त्यात अपयशी ठरले आहेत. इथल्या जनतेला सगळे समजले आहे. त्यांना सीमाप्रश्नापेक्षा विकास महत्वाचा वाटतो. त्यामुळे येथील जनता बदलली आहे ते आता राष्ट्रीय पक्षा सोबत आहेत हे अनेक निवडणुकात दिसले आहे. सध्या सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्याने अधिक बोलणे योग्य होणार नाही. या त्यांच्या विधानामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कडाडी यांचे वक्तव्य म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे. केंद्र सरकारने सीमाप्रशी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी सीमाभागातील मराठी जनता करत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta