
बेळगाव : ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक वीरवाणीचे संपादक श्री. सुनील गणपतराव आपटे (वय 65) यांचे दि. 2 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
सुनील आपटे सिद्धहस्त पत्रकार होते. त्यांनी दै. तरुण भारत, सकाळ, पुढारी, स्वतंत्र प्रगती येथे सेवा बजावली होती. कथा, कविता, संगीतावर त्यांनी अनेक लेखन केले होते. ते गायक नव्हते पण त्यांचा संगीताबद्दल मोठा अभ्यास होता. त्यांचे मंदिराचे वेणुग्राम व ‘क’कवितेचा पुस्तक प्रकाशित झाले आहेत.
सुनील आपटे वीर अर्जुन शाखेचे बालपणापासून स्वयंसेवक होते. ते उत्कृष्ट वंशी वादक. अभ्यास, मनमिळावू, गप्पा गोष्टी रंगविणारा एक ज्येष्ठ पत्रकार हरपला आहे.
गेल्या दोन वर्षापासून ते साप्ताहिक वीरवाणीचे संपादक म्हणून यशस्वीरित्या काम पाहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. त्यातून त्यांची सुटका झाली नाही. 4 जुलैचा हा अंक त्यांनी घरातूनच तपासून लेआऊट पाहून होकार दिला होता. अचानक दुपारी ते अस्वस्थ झाले. उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
साप्ताहिक वीरवाणी परिवारातर्फे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

Belgaum Varta Belgaum Varta