
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मंडोळी येथील काजू फॅक्टरीतून २ हजार ४४९ किलो काजूची चोरी केल्याप्रकरणी उचवडे (ता. खानापूर) येथील तरूण महादेव तुकाराम पाटील (वय ३०) याला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४२ पोती काजू आणि ट्रक (केए २२ सी ९३८७) यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मंडोळी येथील बाळासाहेब कृष्णा पाटील यांच्या फॅक्टरीतून पाच दिवसांपूर्वी (ता.५) काजूची चोरी झाली होती. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान काल बुधवारी (ता.९) बामणवाडी जवळ ४२ पोती काजू वाहतूक करणारा ट्रक पोलिसांना आढळला. चालकाची चौकशी केली असता सदर काजू मंडोळी येथून चोरल्याचे महादेव पाटील याने कबूल केले. त्याला तात्काळ अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस निरीक्षक नागणगौडा कट्टीमनीगौडर, उपनिरीक्षक लकाप्पा जोडट्टी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Belgaum Varta Belgaum Varta