
बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवी मंदिराची दानपेटी उघडण्यात आली असून, एप्रिल ते जून येथील महिन्याच्या कालावधीत देणगी स्वरूपात ३ कोटी ८१ लाख रुपये देणगी जमा झाली आहे. सलग दोन दिवस देणगीची मोजदाद करण्यात आली.
मंदिराला देणगीच्या स्वरूपात ३ कोटी ३९ लाख ४० हजार ८३१ रुपये जमा झाले आहेत. यांसह ३२ लाख ९४ हजार ५०० रुपये किमतीचे ३४० ग्रॅम सोने, २९ लाख ७९ हजार ५०० रुपये किमतीची ८ किलो ७९७ग्राम चांदी देणगी स्वरूपात मिळाली आहे. मंदिराला प्राधिकरणाचा दर्जा प्राप्त झालेला असल्याने प्राधिकरणाचे सदस्य, जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, धर्मादाय खाते, तहसीलदार आणि सौंदत्ती पोलिसांच्या उपस्थितीत मंदिरातील दानपेटी उघडण्यात आली.
२०२३ मध्ये याच कालावधीत १ कोटी ६५ लाख १७ हजार ०५६ रुपये, तर २०२४ मध्ये १ कोटी ९६ लाख ५६ हजार ०३५ रुपयांची देणगी जमा झाली होती. मागील वर्षाचा विचार केल्यास यावर्षी दुप्पट देणगी जमा झालेली आहे.
पंधरा दिवसांपूर्वीच मार्च महिन्यातील देणगी पेटी उघडून त्याची मोजदाद करण्यात आली होती. देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेतून डोंगरावर पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप आणि इतर विकासकार्ये हाती घेतली जाणार आहेत. याप्रसंगी रेणुका मंदिर प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी, तहसीलदार मल्लिकार्जुन हेग्गनावर, धर्मादाय खात्याचे अधिकारी बाळेश अब्बाई, अल्लमप्रभू प्रभुनवर आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta