
बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांनी बेळगावात आज तीव्र आंदोलन केले. “जय हो जनता वेदिके” संघटनेच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी बांगड्या, हळदीकुंकू, साडी, नारळ अशा ओटी भरण्याचे साहित्य हातात घेऊन अनोखे आंदोलन करत आपले पैसे व्याजासहित बँकेने परत करावे अशी मागणी केली.
कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन सहकारी बँकेचा घोटाळा जवळपास 11 महिन्यापूर्वीच उघड झाला होता. ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी कठीण काळात आपल्याला उपयोगी येईल या हेतूने बँकेत जमा केली होती. मात्र सदरी बँकेच्या घोटाळ्यामुळे ठेवीदारांचे पैसे या बँकेत अडकून पडले आहेत. 2022 मध्ये या बँकेवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. त्यावेळी ठेवीदारांना पैसे काढू नका असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले होते. व्यवस्थापनावर विश्वास ठेवून ठेवीदारांनी त्यावेळी बँकेला सहकार्य केले होते मात्र ठेवीदारांची रक्कम अद्याप प्रयत्न मिळाल्याने संतप्त ठेवीदारांनी आज “जय हो जनता वेदिका” या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन केले. संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष शिवानंद हिरेमठ यांनी सदर फसवणुकीसाठी बँक प्रशासनाला जबाबदार धरले आहे. बँकेच्या ठेवीदारांमध्ये बहुतांश लोक हे सेवानिवृत्त असून ज्येष्ठ नागरिक आहेत. प्रत्येक ठेवीदाराला पेन्शन मिळतेच असे नाही. आयुष्यभर नोकरी करून सेवानिवृत्तीनंतर मिळालेला पीएफ व इतर ठेवी विश्वासाने ठेवीदारांनी या बँकेत जमा केले होते. ठेवीदारांनी बँक प्रशासनाकडे ठेवी परत मागितल्या असता त्यांच्या ठेवींच्या तीनपट किमतीची मालमत्ता ठेवीदारांनी स्वीकारावी असे सांगितले जात आहे. यावर ठेवीदारांनी तीव्र आक्षेप घेत आम्हाला कोणतीही जागा अथवा मालमत्ता नको तर आम्हाला आमचे पैसे व्याजासहित बँकेने परत द्यावे अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या रकमे ऐवजी जागा किंवा शेतजमीन देऊ केली जात आहे असे हिरेमठ यांनी सांगितले. कर्नाटक राज्यसंवर्धन सहकारी संस्था पैसे परत मिळवून देण्यासाठी कोणतेच ठोस पाऊल घेत नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. भविष्याचे तरतूद म्हणून ठेवीदारांनी या बँकेत गुंतवणूक केली होती मात्र ठेवीदारांच्या पदरी केवळ निराशाच पडली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta