
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
—————————————————————–
बेळगाव : बेळगावसह सीमाभागात कर्नाटक प्रशासनाकडून कन्नडसक्तीचा बडगा उगारण्यात आला आहे. या कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून मध्यवर्तीच्या बैठकीत यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. कन्नडसक्ती विरोधात ऑगस्टमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आज दिनांक 15 जुलै रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मराठा मंदिर बेळगाव येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर हे होते. मागील काही दिवसापासून बेळगावात प्रशासनाकडून कन्नडसक्ती तीव्र करण्यात आली आहे. महानगरपालिकेत नामफलकांवरील मराठी आणि इंग्रजी भाषा पूर्णतः नामशेष करण्यात आली असून त्यावर केवळ कन्नड फलक लावण्यात आले आहे. याबाबत बोलताना कार्याध्यक्ष मनोहर किणेकर म्हणाले की, कर्नाटकात जरी आपण अल्पसंख्यांक असलो तरी बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांची संख्या पंधरा टक्क्याहून अधिक आहे. भाषिक हक्कांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात येत्या 20 जुलैनंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कन्नड प्रमाणेच मराठी भाषेत देखील बोर्ड लावण्यासंदर्भात समितीचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नी खटल्यासंदर्भात लवकरात लवकर कोल्हापूर येथे तज्ञ समितीच्या अध्यक्षांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कन्नडसक्ती विरोधात ऑगस्ट महिन्यात मोर्चा काढण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून घटक समितीच्या बैठका घेऊन याबाबत पुढील रुपरेषा ठरविण्यात येणार आहे.
माजी महापौर मालोजीराव अष्टेकर म्हणाले की, कन्नडसक्तीसंदर्भात काही बाबी मराठी भाषिकांच्या हिताचा विचार करून गुप्त ठेवणे गरजेचे आहे. कन्नडसक्ती विरोधातील समितीची भूमिका जाहीरपणे मांडणे ऐवजी महाराष्ट्र एकीकरण समितीने गनिमी काव्याने हा लढा लढला पाहिजे. कन्नडसक्ती विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती कोणत्या पद्धतीने काम करत आहे याबाबत समितीची भूमिका जगजाहीर करण्याची गरज नाही. काही गोष्टींमध्ये गुप्तता राखणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे कन्नडसक्ती विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात घटक समित्यांची बैठक घेऊन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काही सूचना आल्या असून त्यानुसार मोर्चासंदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यात येईल त्याचप्रमाणे तज्ञ समितीशी समन्वय साधून सीमाभागातील समस्या त्याचप्रमाणे सीमाप्रश्न संदर्भात चर्चा करण्यासाठी समितीचे शिष्टमंडळ प्रयत्नशील असल्याचे देखील अष्टेकर यांनी सांगितले. नवनिर्वाचित तज्ञ समितीची।बैठक सीमा भागाजवळ नव्हे तर सीमा भागातच घेण्यासंदर्भात समितीतर्फे विनंती करण्यात येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले तसेच ऍड. उज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली आहे. ऍड. निकम यांचे बेळगावशी असलेले नाते हे खूप जवळचे आहे. बेळगाव मुक्कामी आलेल्या उज्वल निकम यांनी सीमा प्रश्नसंदर्भात आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या संदर्भात देखील निकम यांची भेट घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे देखील यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, बी डी मोहनगेकर, मारूती परमेकर, रामचंद्र मोदगेकर, रणजित चव्हाण-पाटील, मुरलीधर पाटील, विलास बेळगावकर, रणजित पाटील, ऍड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले यांच्यासह अन्य सदस्यांनी आपले विचार मांडले.
बैठकीला ऍड. राजाभाऊ पाटील, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, जयराम देसाई, पांडुरंग सावंत, रावजी पाटील, बी. ओ. येतोजी, अजित पाटील, मनोहर हुंदरे, पियुष हावळ यांच्यासह मध्यवर्तीचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta