
बेळगाव : पिरनवाडी नगरपंचायतीच्या व्याप्तीतील खादरवाडी येथील सर्व्हे क्र. 407 ते 450/6 (450/3) दरम्यानच्या जमीन वादाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी खादरवाडी येथील संतप्त शेतकरी आणि गावकऱ्यांनी आज गुरुवारी एका निवेदनाद्वारे बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे केली आहे.
खादरवाडी येथील त्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी आज सकाळी गावातील नेतेमंडळी व शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना सादर केले. यावेळी कोंडुसकर यांनी खादरवाडी येथील जमीनवादाची माहिती आणि त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप याबद्दल पोलीस आयुक्तांना सविस्तर परंतु मुद्देसूद माहिती दिली. तसेच गावातील संबंधित शेतकऱ्यांसह समस्त गावाला न्याय मिळवून देण्याची विनंती केली.
पोलीस आयुक्त बोरसे यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. गेल्या वर्षी 23 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयाला पिरनवाडी नगरपंचायतीच्या खादरवाडी येथील सर्व्हे क्र. 407 408/2 409 410 411 413 414 415 416 417 448/7 (448/2), 449/2, 450/6 (450/3) या जमीन वादाची चौकशी करण्यासाठी विनंती केली होती. परंतु आजपर्यंत आपल्याकडून चौकशी किंवा कारवाई सुरू झालेली नाही. परिणामी सर्व ग्रामस्थमध्ये (शेतकरी व गावकरी) वाद सुरू आहेत. तेंव्हा आपल्याला विनंती आहे की, कृपया खादरवाडी ग्रामस्थांच्यावतीने चौकशी समितीची बैठक बोलवावी आणि त्यानुसार आम्हाला उपस्थित राहण्यास कळवावे.
कोणत्याही राजकीय दबावाशिवाय या प्रकरणाची चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी. आशा आहे आमच्या तक्रार वजा मागणीची आपण गांभीर्याने दखल घ्याल आणि प्रकरणाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर खादरवाडी गावचे ग्रामस्थ असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्याल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यास आलेल्या खादरवाडी ग्रामस्थांमध्ये महिलावर्गाची संख्या लक्षणीय होती.

Belgaum Varta Belgaum Varta