
बेळगाव : “चळवळीत आपल्या पतीबरोबर काम करीत असतानाच या जगाचा निरोप घेताना आपल्या शरीराचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून देहदान करणाऱ्या कलाताईंनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांचे हे कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल” असे विचार प्रा. आनंद मेणसे यांनी बोलताना व्यक्त केले.
गेल्या मंगळवारी सौ. कला सातेरी यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भगतसिंग सभागृह गिरीश कॉम्प्लेक्स येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे हे होते.
प्रारंभी कला ताईंच्या प्रतिमेस बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर व मीरा मादार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विविध मान्यवरांनी कै. सौ. कला सातेरी यांना श्रद्धांजली वाहिली.
मराठा समाज सुधारणा मंडळ, पायोनियर अर्बन बँक व जायंट्स ग्रुपच्या वतीने शिवराज पाटील, पत्रकार संघाच्या वतीने कृष्णा शहापूरकर, सातेरी परिवाराच्या वतीने संजय सातेरी, मराठी वकील संघटनेच्या वतीने ऍड. सतीश बांदिवडेकर, सार्वजनिक वाचनालय व घुमटमाळ मारुती मंदिरच्या वतीने अनंत लाड, येळ्ळूर साहित्य संघाच्या वतीने परशुराम मोटराचे, पत्रकार अनिल आजगावकर, माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने अनिल पाटील, मराठा मंडळाच्या वतीने रामचंद्र मोदगेकर, शिवलीला हिरेमठ, सभीना सावंत व मीरा मादार आदींनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी देहदानाचे महत्त्व सांगून आनंद मेणसे यांनी कला सातेरी यांच्या जीवनाचा आढावा घेताना कला सातेरी यांनी महिला अन्याय निवारण समिती, भारतीय महिला फेडरेशन, अन्नपूर्णा महिला मंडळ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अंगणवाडी महिला संघटना आदि संघटनांमध्ये कार्य केले अशी माहिती दिली. याप्रसंगी चळवळीतील अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta