
बेळगाव : मराठी भाषेची कावीळ झालेल्या कन्नड संघटनांसह महानगरपालिका प्रशासनाची वक्रदृष्टी आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मराठी फलकांवर पडली आहे. पाटील गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शहीद भगतसिंग चौकात उभारलेला मराठी फलक पालिका प्रशासनाने शुक्रवारी (दि. 25) रोजी हटविला.
दरम्यान, कन्नड भाषेची सक्ती करणारा आदेश केवळ नामफलकापुरता मर्यादित असतानाही महापालिकेने शहरात मनमानी सुरु केली आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गणेशोत्सव मंडळांनी ठिकठिकाणी पाटपूजना निमित्त मराठी फलक उभारला होता. हा फलक महापालिकेला खुपला. मनपाच्या पथकाने शुक्रवारी संध्याकाळी तो फलक जप्त केला. फलक जप्त करताना व्यापारी वर्गाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. व्यापारी आस्थापनांना लागू असलेला नियम धार्मिक कार्यक्रमांना का लावण्यात येत आहे, असा सवाल करण्यात आला. त्यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ‘आम्हाला आदेश असल्यामुळे आम्ही हा फलक हटवत आहोत’, असे उत्तर दिले. आमच्याकडे तक्रार आली आहे, त्यामुळे आम्ही तो हटवत आहोत, असेही सांगितले.
फलक हटवत असल्याची माहिती मिळताच सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे रणजीत चव्हाण-पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. महापालिकेच्या या मनमानी कारवाईचा निषेध केला. त्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या कानावर घालण्यात आली. गेल्या आठवड्यात शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी गणेशोत्सव मंडळांची बैठक घेतली होती. त्यावेळी गणेशोत्सवात मराठी फलक हटवण्यात येवू नयेत, अशी मागणी केली होती. तर दोन दिवसांत शहापूर विभाग गणेशोत्सव मंडळाची बैठक होणार आहे. पण गणेशोत्सव ऐन तोंडावर असताना महापालिकेने मात्र भाषिक रंग देत मराठी फलकांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.
आयुक्तांना सोमवारी भेटणार
पाटील गल्ली गणेशोत्सव मंडळाचा मराठी भाषेतील फलक हटविल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून, या प्रकाराविरोधात सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सोमवारी (दि. 28) महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta