बेळगाव : शेतकऱ्यांना बाजारात युरिया खत मिळत नसल्याने आणि खत विक्रेते दुप्पट दराने त्याची विक्री करत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडत असून भात उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सोमवारी बेळगाव शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेळेवर युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले.
यावेळी शेतकरी नेते राजू मरवे म्हणाले की, “बेळगाव शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मे महिन्यात भात लावणी केली होती. पण अतिवृष्टीमुळे लावलेले भात पूर्णपणे खराब झाले. त्यामुळे पुन्हा एकदा भात लावणी करावी लागली. आता भाताची वाढ होण्यासाठी युरियाची आवश्यकता आहे. मात्र, बाजारात युरियाचा तुटवडा असल्याने काही खत विक्रेते जास्त दराने विक्री करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.” अतिवृष्टीमुळे दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आता खतांच्या दरवाढीचा आणि तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta