कोल्हापूर : मराठी साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक वारसा जतनाची अखंड साधना करणारे आदर्श शिक्षक आणि समाजाचे संस्कृतीदूत सीमाकवी रवींद्र मारुती पाटील यांना जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठ, युनायटेड किंग्डम यांच्याकडून “सांस्कृतिक व कलापरंपरागत” (Culture and Performing Arts) या क्षेत्रातील सन्मानार्थ ‘मानद डॉक्टरेट ‘ (Honorary Doctorate) पदवी जाहीर करण्यात आली आहे. हा जागतिक सन्मान त्यांना विद्यापीठाकडून अधिकृत पत्राद्वारे कळविण्यात आला.हा प्रतिष्ठित सन्मान त्यांच्या सांस्कृतिक, कलात्मक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल म्हणून देण्यात आला आहे. ग्रामीण भागातून मराठी साहित्य व लोककला जागतिक पातळीवर पोहोचवणे, साहित्य संमेलने, काव्य महोत्सव, संस्कृती, शैक्षणिक क्षेत्रात जपणारे उपक्रम आणि भाषिक अस्मिता जोपासणे या क्षेत्रात त्यांनी बहुमूल्य कार्य केले आहे. सीमाकवी रवींद्र पाटील हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष, चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे सक्रिय कार्यकर्ते, शिवसंदेश भारत समूहाचे सदस्य, तसेच आदर्श शिक्षक, कवी, गीतकार, तंत्रस्नेही, निवेदक, समालोचक, व्याख्याते आणि ‘शिवसंदेश न्यूज’चे संपादक म्हणून ओळखले जातात. पाटील हे मूळचे बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावचे असून राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बुद्रुक येथे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मराठी भाषेसंदर्भात त्यांचे विविध उपक्रम, कोजिम’च्या सांस्कृतिक कार्यक्रमांतील सक्रिय सहभाग, अनेक पुरस्कारांनी गौरवलेले साहित्यिक कार्य, आणि समाजप्रबोधनासाठीची त्यांची निष्ठा यामुळे ते एक बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने ही मानद पदवी त्यांच्या सृजनशील प्रतिभा, निष्ठा आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनातील योगदानाचा सन्मान म्हणून बहाल केली आहे. कलांमधून समाजाशी संवाद साधणे, लोकांमध्ये समरसतेची भावना जागवणे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणे या त्यांच्या कार्याचा आज जगभर सन्मान होत आहे. रविवार दि. २४ ऑगस्ट रोजी २०२५ रोजी पुणे येथे आयोजित भव्य गौरव सोहळ्यात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या सन्मानामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, शिवसंदेश समूह बेळगाव, कोजिम परिवार कोल्हापूर आणि चंदगड मराठी अध्यापक संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या अभूतपूर्व यशामुळे मराठी साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात आनंद व अभिमानाची लाट उसळली आहे. विविध मान्यवरांनी या सन्मानाला – “संपूर्ण मराठी समाजासाठी प्रेरणादायी टप्पा” — असे गौरवोद्गार काढले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta