
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील डोळे दीपतील बेळगावच्या राजाचं सुंदर रूप पाहायला मिळालं. दरवर्षी गणेशोत्सवात ‘बेळगावचा राजा’चं दर्शन घेण्यासाठी बेळगावच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर ग्रामीण भागातील भाविक आगमन सोहळ्याला धर्मवीर संभाजीराजे चौकात येत असतात. शुक्रवारी रात्री 11 वाजता धर्मवीर संभाजीराजे चौकात 18 फूट उंचीच्या ‘बेळगावचा राजा’चे दिमाखात आगमन होताच राजाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. इतक्या पाऊस थांबला आणि बेळगावच्या राजाची पहिली झलक गणेश भक्तांना पाहायला मिळताच मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे हा सीमाभागातील सर्वात पहिला गणपती आगमन सोहळा असतो. बेळगावच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी हजारो बेळगावकर सायंकाळ पासूनच धर्मवीर संभाजीराजे चौकात जमले होते. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बेळगावातील सुप्रसिद्ध बेळगावचा राजा गणपतीच्या पहिल्या लूकचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. यानंतर बेळगावचा राजाचे पूजन पोलीस उपयुक्त नारायण बरमनी, माजी आमदार अनिल बेनके, भाजपा नेते मुरगेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते शोल्क राजू कडोलकर, रोहित रावळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनिल जाधव यासह मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित होते.
बेळगावच्या राजाचे मूर्तिकार रवी लोहार यांनी ही मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती प्रभावळीसह 21 फूट उंच आहे. 9 वाजल्यांनंतर परिसरात गर्दीचा महापूर आला होता. रात्री आठ वाजेपर्यंत हजारो गणेश भक्त एकत्र येत होते. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद खावा लागला. बेळगावचा राजा आल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ढोल-ताशा पथक व इतर वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन साऊंड सिस्टीम असलेली वाहने मूर्तीजवळ पोहोचू दिली नाहीत.
या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे यंदा देखील पोलिसांचा सहा वाजल्यापासूनच धर्मवीर संभाजीराजे चौक परिसरात कडक पोलीस बंदोबस्त होता पोलीस उपयुक्त नारायण बरमनी यांच्या नेतृत्वाखाली मार्केट व खडेबाझर पोलीस सहआयुक्त पोलीस निरीक्षक उपस्थित होते. 10 पोलिस अधिकारी आणि मोठ्या फौज फाटा बंदोबस्ताला होता तर महामार्गावरही अनेक जण आगमन सोहळा पाहण्यासाठी थांबल्याने येथील वाहतूकही विस्कळीत झाली. तरुणाईच्या गर्दीने फुलून गेला. रात्री उशिरापर्यंत येथे सळसळता उत्साह पाहायला मिळाला.

Belgaum Varta Belgaum Varta