बेळगाव : शहापूर येथील गजाननराव भातकांडे हायस्कूल जवळील नाल्याच्या ठिकाणी रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून ताबडतोब हटवण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
शहापूर येथील गजाननराव भातकांडे हायस्कूल नजीकच्या नाल्याच्या ठिकाणी रस्त्याशेजारी स्थानिक रहिवाशांसह ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून कचरा फेकला जातो. या कचऱ्याची उचल करण्याकडे किंवा या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. परिणामी संबंधित ठिकाणी रस्त्याशेजारी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेल्या ओल्या व सुक्या कचऱ्याचा ढिगारा निर्माण झाला आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन रस्त्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. याखेरीज सध्याच्या पावसामुळे कचरा कुजून रस्त्यावर दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असते. परिणामी पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाताना नाक मोठी धरून जावे लागत आहे. याखेरीज मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरातील सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी लोकप्रतिनिधींसह महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भातकांडे शाळेजवळील सदर कचऱ्याचे साम्राज्य तात्काळ हटवण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी ॲड. मारुती कामान्नाचे त्यांच्यासह त्रस्त जागरूक नागरिकांनी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta