
बेळगाव : कर्नाटक राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा-२०२५ (के-एसईटी-२०२५) कर्नाटक परीक्षा प्राधिकारणाद्वारे ०२.११.२०२५ रोजी आयोजित करण्यात आली असून २८ ऑगस्ट पासून उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
यंदा सदर परीक्षांसाठी बेळगाव केंद्र देण्यात आले आहे. मात्र परीक्षेतून मराठी विषय वगळण्यात आला आहे. यावर्षी यामध्ये वाणिज्यशास्त्र, कन्नड, अर्थशास्त्र, इंग्रजी, राज्यशास्त्र, इतिहास, समाज शास्त्र, भूगोल, हिंदी, शिक्षण, समाजकार्य, कायदा, शारीरिक शिक्षण, गृह विज्ञान, संगीत आदी ३३ विषयातून सदर परीक्षा घेण्यात येणार आहेत पण पूर्वी समाविष्ट असलेल्या मराठी विषयाला या वर्षी वगळण्यात आले आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठ, धारवाड विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ, बीदर विद्यापीठ यासारख्या नामवंत विद्यापीठांमध्ये मराठी विषय शिकवला जात असून यामध्ये १५०० हून अधिक विद्यार्थी आज पदव्युत्तर शिक्षण तथा एम.ए. करत आहेत. पण (केईए) के-सेट पात्रता परीक्षेतून मराठी विषय वगळण्यात आल्यामुळे भविष्यात प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगणार असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
प्राध्यापक होण्यासाठी ही पात्रता परीक्षा महत्त्वाची असून, त्यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी ही परीक्षा देतात, सदर परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून यावर्षीही सदर के-सेट परीक्षेत मराठी विषय समाविष्ट करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यकारी संचालक कर्नाटक परीक्षा प्राधिकार, आणि उच्च शिक्षण मंत्री कर्नाटक यांच्या नावे देण्यात आले. जिल्हाधिकारांच्या अनुपस्थितीत शिरस्तेदार फैजी यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे, सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, ॲड. वैभव कुट्रे, शेखर तळवार, शांताराम होसुरकर, सुरज चव्हाण, ॲड. अश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta