
बेळगाव : काकती (ता. जि. बेळगाव) गावामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तरी सदर कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी काकती ग्रामपंचायतीसह समस्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
काकती ग्रामपंचायत अध्यक्ष व्ही. एल. मुचंडीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ग्रामपंचायत सदस्य गजानन गवाणे यांनी सांगितले की, काकती गावामध्ये अलीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्यावर अन्नाच्या शोधार्थ फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचे कळप नागरिकांसाठी धोकादायक बनले आहेत. भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये गावातील अनेक जण जखमी झाले असून काहींवर हॉस्पिटलमध्ये दीर्घ उपचार घेण्याची वेळ आली आहे. गावातील कांही रस्त्यांवर या भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असल्यामुळे नागरिकांना विशेष करून महिला व बालकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखणे आवाक्याबाहेर असल्यामुळे काकती ग्रामपंचायतने यापूर्वी बेळगाव महापालिकेकडे गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली होती.
मात्र अद्यापपर्यंत त्या अनुषंगाने कोणतीच कारवाई न झाली असल्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकार्यांकडे धाव घेतली आहे. निवेदनाद्वारे मी त्यांना कागदी गावातील उपद्रवी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे अशी माहिती देऊन कागदी मधील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे गरजेचे असल्याचे मत होते ग्रामपंचायत सदस्य गवाणे यांनी व्यक्त केले. निवेदन सादर करतेवेळी अन्य ग्रामपंचायत सदस्यांसह काकती येथील नागरिक महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta