बेळगाव : आज शनिवारी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शांतता सुव्यवस्थेच्या संदर्भात विशेष काळजी घेऊन तयारी केली आहे. श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. आम्ही आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहोत. नियमांचे पालन करा आणि विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडा, असे आवाहन बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.
उद्याच्या विसर्जन मिरवणुकीसंदर्भात अधिक माहिती देताना आयुक्त बोरसे पुढे म्हणाले, गेल्या महिन्याभरापासून बेळगाव शहरातील गणेशोत्सव आणि श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकी संदर्भात शहरातील मंडळे लोकप्रतिनिधी महापालिका आणि विविध खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने चर्चा करून उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत. विसर्जन ठिकाणी सर्व प्रकारची सुसज्ज यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक शांतते पार पाडावी यासाठी, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कत आहोत.
पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे मंडळांनी पालन करावे. अनेक मंडळांनी पारंपारिक वाद्ये वाजविण्याबाबत सांगितले आहे. डॉल्बीच्या आवाजासंदर्भात नियम अटी घालण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषण होऊ नये याची प्रत्येक मंडळांनी खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
उद्याच्या विसर्जन मिरवणुकीसाठी 500 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस, एक जलद कृती दलाची तुकडी, दहा केएसआरपी प्लाटून, त्याचबरोबर 14 ड्रोन कॅमेरे तर 700 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. संवेदन आणि अति संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंद ठेवण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी चार वाजल्यापासून नेमून दिलेल्या ठिकाणी सर्व अधिकारी आणि पोलीस बंदोबस्ताच्या कामात गुंतलेले असतील. सर्वांनी श्रीमुर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पाडावी यासाठी, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे कळकळीच्या आवाहन ही आयुक्त बोरसे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta