बेळगाव : अनगोळ शिवशक्ती नगर मधून काल दुपारी तीन तीस वाजता गल्लीतील दोन मुले गणपती बघायला जातो म्हणून घराबाहेर गेली होती. आज सकाळ झाली तरी ती दोन्ही मुले घरी आतापर्यंत पोहोचलेली नव्हती. याबद्दलची माहिती माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक गुंजटकर यांना मिळाली. विनायक गुंजटकर यांनी तात्काळ सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या मुलांच्या बद्दलची माहिती प्रसारित केली होती. त्या मुलांचा ठावठिकाणा कळाल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही गुंजटकर यांनी केले होते.
दरम्यान काल रात्री रिक्षाचालक रफिक मुल्ला यांना ती मुले फिरत असताना नजरेत पडली. रफिक मुल्ला यांनी त्या मुलांना खायला दिले आणि त्यांना त्यांच्या घरचा पत्ता विचारला असता त्यांनी आपण गोडसेवाडीत राहतो असे सांगितले. त्यानुसार मुल्ला यांनी त्या मुलांना काल रात्रीच गोडसेवाडी परिसरात सोडले होते.
आज शनिवारी सकाळी ती दोन मुले हरवल्याची माहिती त्यांना सोशल मीडिया मधून कळताच, त्यांनी तात्काळ विनायक गुंजटकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्या मुलांसंदर्भात माहिती दिली. त्यानंतर विनायक गुंजटकर यांनी रफिक मुल्ला आणि पोलिसांसोबत गोडसेवाडी परिसरात जाऊन त्या मुलांचा शोध घेतला. त्यावेळी एका होमगार्डलाही ती दोन मुले नजरेत आली होती. त्या दोन्ही मुलांना पोलिसांकडे पोहोचवण्यासाठी निघाला होता. त्याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर विनायक गुंजटकर यांनी त्या दोन्ही मुलांना पोलिसांसमवेत ताब्यात घेतले आणि त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta