बेळगाव : अलीकडच्या काही वर्षात डॉल्बी म्हणजे गणेशोत्सव असे एक समीकरण बनलेले पाहायला मिळते. उत्सवातून प्रबोधनात्मक विधायक कार्य घडणे आवश्यक आहे. मात्र असे कार्य कमी घडताना दिसत आहे. मात्र, बॅरिस्टर नाथ पै चौक मंडळांने लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा केला आहे, असे प्रतिपादन विश्व भारत सेवा समितीचे सचिव प्रकाश नंदीहळी यांनी बोलताना केले.
बॅरिस्टर नाथ पै चौक गणेशोत्सव मंडळ यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात मंडळाने अनेक सामाजिक सांस्कृतिक विधायक आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा शाल पुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महापालिकेचे शहापूर विभागातील आरोग्य निरीक्षक हनुमंत पाटील, महापालिकेच्या सेवेतून नुकतेच निवृत्त झालेले श्याम चौगुले तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे एएसआय धनकवडे यांचाही मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष सचिन रंगरेज, परशुराम घडी, प्रदीप मजुकर, लक्ष्मण छत्रण्णावर, हिरालाल चव्हाण, यल्लाप्पा बसरीकट्टी अण्णाप्पा मुगळीकर, श्रीकांत काकतीकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून, मंडळाच्या वतीने सायंकाळी प्रकाश नंदीहळी, शेखर करंबळकर, दीपक धामणेकर, किरण कदम, एम एन पाटील, एम. बी. बाचीकर, वासुदेव कदम, शंकर चव्हाण आदी शिक्षकांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल भेटवस्तू आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित सन्माननीय शिक्षकांनी मंडळांने सुवर्ण महोत्सवी वर्षात राबविलेल्या विधायक उपक्रमांची प्रशंसा केली. मंडळाने बेळगावातील इतर मंडळांसमोर कार्याचा आदर्श निर्माण केल्याचेही मान्यवर शिक्षकांनी मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी शेखर करंबळकर यांनी मंडळाला 50001 रुपयांची देणगी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta