बेळगाव : सीमाप्रश्नाला चालना देण्यासाठी उद्या (ता. १०) मुंबई येथे तज्ज्ञ समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या कामकाजाबाबत योग्य ती माहिती आणि सल्ला देण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीची बैठक मुंबईतील मंत्रालयात दुपारी तीन वाजता होणार आहे. सीमाप्रश्नाच्या दाव्यासाठी महाराष्ट्र सरकारने दीड महिन्यांपूर्वी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीचे अध्यक्षपद खासदार धैर्यशील माने यांच्याकडे असून खासदार धनंजय महाडिक सहअध्यक्ष आहेत. याशिवाय, दिनेश ओऊळकर, सीमाप्रश्नाचे ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव, ऍड. महेश बिर्जे, प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव तसेच विशेष आमंत्रित म्हणून रामकांत कोंडुसकर, आंनद आपटेकर उपस्थित राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी, यासाठी अनेक महिन्यांपासून तज्ज्ञ समितीची बैठक व्हावी, यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानंतर अनेक महिन्यांनी बैठक होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात रखडलेली याचिका सुनावणीला लवकर यावी, यासाठी प्रयत्न होणार का, याकडे मराठी भाषकांचे लक्ष लागून असणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta