
बेंगळूर : मराठा समाजातील मान्यवरांची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली. गोसाई मठाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी निगडित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीला आमदार श्रीनिवास माने, विधानपरिषद सदस्य डॉ. मारुतीराव मुळे, मंत्री संतोष लाड, माजी मंत्री पीजीआर सिंधिया, कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा परिषद अध्यक्ष सुरेशराव साठे, शामसुंदर गायकवाड, केसरकर, बेळगाव मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांच्यासह राज्यातील मराठा समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील सिद्धरामय्या सरकारकडून जातीय जनगणना प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू होत असून, त्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. जनगणना फॉर्ममधील रकाना क्रमांक 16, 17 आणि 18 मध्ये मराठा समाज बांधवांनी अनुक्रमे मातृभाषा ‘मराठी’, धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘मराठा/कुणबी’ असा स्पष्ट उल्लेख करावा, असा ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
याबाबत जनजागृतीसाठी जिल्हावार, तालुकावार व गावपातळीवर बैठका घेण्याचे आणि परिपत्रक वाटप करून समाज बांधवांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचे ठरले. किरण जाधव यांनी यावेळी “जनगणनेला अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे, त्यामुळे समाजाने सजग राहून योग्य नोंद करून घ्यावी,” असे आवाहन केले.
बैठकीत स्वामी श्री मंजुनाथ स्वामीजी, सुरेशराव साठे, शामसुंदर गायकवाड यांसह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. नागेश देसाई, विनायक कदम, धनंजय जाधव यांच्यासह इतर समाज बांधव देखील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta