बेळगाव : बेळगाव येथील ‘जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशन’ला कृषी पणन विभागाच्या निर्देशकांनी मोठा धक्का दिला आहे. परवान्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे तसेच शेतकरी हिताचे रक्षण करण्यात अपयश आल्यामुळे ‘एपीएमसी’च्या निर्देशकांनी लायसन्स रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
बेळगावमधील ‘जय किसान’ या खासगी भाजी मार्केटला कृषी पणन विभागाने हा मोठा धक्का दिला आहे. याआधी ‘बुडा’ने भूखंडाच्या वापराबाबतचा आदेश रद्द केल्याने खासगी भाजी बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर, व्यापाऱ्यांनी बेळगाव महानगरपालिकेकडे धाव घेऊन घाईगडबडीत निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली होती. परंतु, आता ‘एपीएमसी’ निर्देशकांनी दिलेल्या आदेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ‘जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशन’ला खासगी बाजारपेठ स्थापन करून ती चालवण्यासाठी दिलेले लायसन्स आणि त्याच्या नियमांचे पालन केले जात नाही, अशा अनेक तक्रारी शेतकरी संघटनांनी केल्या होत्या. तसेच, सरकारकडून नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाने दिलेल्या अहवालात आणि कृषी पणन विभागाच्या उपनिर्देशकांनी सादर केलेल्या अनेक तपासणी अहवालांमध्येही याच बाबी समोर आल्या होत्या. या सर्व तक्रारी आणि अहवालांची सखोल तपासणी केली असता, लायसन्सच्या अटी-शर्तींचा स्पष्टपणे भंग झाल्याचे आणि लायसन्सधारकांनी शेतकरी हिताचे रक्षण करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे, योग्य आणि कायदेशीर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर, ‘कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार व्यवहार (नियंत्रण आणि विकास) अधिनियम, १९६६’ च्या कलम ७२-डी अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, ही खासगी बाजारपेठ चालवण्याचे लायसन्स तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहे, असे आदेश ‘एपीएमसी’ निर्देशकांनी जारी केले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta