जनगणना सर्वेक्षणादरम्यान मराठा समाजाने जागरूक रहावे
बेळगाव : 22 सप्टेंबरपासून 7 ऑक्टोबरपर्यंत राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण होणार आहे. जातीनिहाय जनगणना सर्वेक्षणामध्ये मराठा समाजाने कोणत्या पद्धतीने नोंदी कराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सकल मराठा समाजाने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन जत्तीमठ येथे केले होते. या बैठकीमध्ये धर्म: हिंदू, जात:मराठा, पोटजात:कुणबी, मातृभाषा:मराठी अशा नोंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीदरम्यान बोलताना सकल मराठा समाजाचे संयोजक प्रकाश मरगाळे म्हणाले की, या सर्वेक्षणात कुणबी असा उल्लेख केल्यास कोणताही गैरसमज होण्याचे कारण नाही. कोणत्याही निकषाची परवा न करता सीमाभागातील मराठा समाजाने या सर्वेक्षणामध्ये हिंदू, मराठा, कुणबी, मराठी अशीच नोंद करावी याचा फायदा भविष्यात आपल्या मुलांना नक्कीच होईल.
गुणवंत पाटील म्हणाले की, आरक्षण आणि शैक्षणिक फायदे मिळविण्यासाठी मराठा समाजाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सर्वेक्षणात योग्य ती नोंद करणे गरजेचे आहे. समाजाच्या एकत्रितकरणासाठी ही बाब महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे जिथे जिथे मराठा समाज आहे त्या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी या सर्वेक्षणाविषयी जनजागृती करावी. ज्यांची सरकारी नोकरी आहे किंवा जे राजकारणात मोठे प्रस्थ आहे. मोठे उत्पन्न आहेत अशा प्रत्येकाने जातीच्या रकाने कुणबी अशीच नोंद करावी असे आवाहन क्षत्रिय मराठा समाज तसेच बेळगाव मधील सकल मराठा समाजानेही याच प्रकारे नोंद करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत रंगभूमी पॅलेस येथे बैठका घेऊन समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. रविवारी मराठा मंदिर येथे यासंदर्भात व्यापक बैठक होणार असून यामध्ये समाजाला सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. या बैठकीला रमाकांत कोंडुस्कर, किरण जाधव, रणजित चव्हाण पाटील, शिवराज पाटील, नागेश देसाई, दत्ता जाधव, सुनील जाधव, नेताजी जाधव, अनिल पाटील, राजू मुरवे, एम आर पाटील, दीपक पावशे, मोहन मोरे, नगरसेवक राजू भातकांडे, नगरसेवक नितीन जाधव, विनोद भागवत, बाबू कोले, श्रीधर खन्नुकर, आनंद आपटेकर, सचिन पाटील, विजय भोसले, मनोहर हलगेकर, राजू बिर्जे, सागर पाटील यांच्यासह मराठा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta