एपीएमसी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
बेळगाव : बेळगाव शहरातील जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटचा व्यापारी परवाना रद्द करण्याची कारणे स्पष्ट करून शेतकरी बांधवांनी यापुढे आपली कृषी उत्पादने कंग्राळी रस्त्यावरील बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) मार्केट यार्ड मध्ये विक्रीसाठी आणावीत, असे आवाहन एपीएमसीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
बेंगलोर येथील कृषी पणन खात्याच्या संचालकांनी सोमनाथ नगर बेळगाव येथील जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट्स असोसिएशनचा पर्यायाने जय किसान होलसेल मार्केटचा व्यापारी परवाना रद्द केला आहे.
सदर परवाना रद्द करण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत शेतकऱ्यांकडून कमिशन उकळणे, शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी कोणतेही क्रम घेतले जात नव्हते, कृषी उत्पादन व्यवहारांच्या कागदपत्रांची पूर्तता केली जात नव्हती, कृषी उत्पादनांच्या विक्री प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली जात नव्हती, शेतकऱ्यांच्या माहितीसाठी दर फलक लावला जात नव्हता, शेतकऱ्यांकडून विक्री झाल्यानंतर संबंधित कृषी उत्पादनाला बाजारात किती दर मिळाला याची माहिती शेतकऱ्यांना दिली जात नव्हती, शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांचा साठा करण्यासाठी शीतगृहाची सोय नाही, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राष्ट्रीय अथवा शेड्युल बँकांची सुविधा नाही, शेतकऱ्यांसाठी असलेल्या रयत भवनमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव, भाजीपाला विक्रीच्या जमाखर्चाचा हिशोब ठेवला जात नव्हता. या सर्व कारणास्तव सदर खाजगी भाजी मार्केटच्या जागेमध्ये सुरू असलेली खरेदी-विक्री हे कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. सदर जागेमध्ये व्यापार वहिवाट करणे शिक्षा पात्र आहे. या ठिकाणी व्यापार करणारे व्यापारी कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार व्यवहार (नियंत्रण व विकास) अधिनियम 1966 अंतर्गत गुन्ह्यास पात्र आहेत. तेंव्हा शेतकरी बांधवांनी कंग्राळी रस्त्यावरील बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये आपला भाजीपाला अथवा अन्य कृषी उत्पादनांची विक्री करावी ही विनंती, असा तपशील बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.
Belgaum Varta Belgaum Varta