
बेळगाव : तुमची मेहनत आणि मनाची निष्ठा हेच खरे गुरु आहेत; धाडस करा, दिवसात छोटी छोटी उद्दिष्टे ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत रहा, यश तुमच्या पावलावर येईल, असे प्रतिपादन सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले यांनी केले.
दि. बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बेळगाव यांच्या वतीने सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव समारंभ नुकताच सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मारुती सदावर होते. व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन शिवाजी शहापूरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. व्ही. व्ही. गोदे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे रणजीत चौगुले यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात रणजीत चौगुले यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिनचर्या कशी ठेवावी, वेळेचे प्रभावी नियोजन कसे करावे, आणि दीर्घकालीन उद्दिष्टे कशी ठरवावी याबाबत स्पष्ट व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना चिकाटी रक्षणाचे, चुका स्वीकारून त्यातून शिकण्याचे आणि गुणांपेक्षा ज्ञान व कौशल्यावर भर देण्याचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात एकूण 125 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे व इतर वस्तु देऊन गौरवण्यात आले. त्याचे वाचन एम. एस. सनदी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्ही. व्ही. गोदे यांनी केले. यावेळी संचालक कृष्णराव मोदगेकर, मल्लाप्पा चौगुले, सौ. निर्मला कामुले, रमेश मोदगेकर, मिलिंद पावशे, रघुनाथ पाटील, नंदा बिर्जे, उदय किल्लेकर, किसन रेडेकर, जयवंत खन्नुकर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta