बेळगाव : शुक्रवारी रात्री बेळगाव शहरात मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणाच्या खिशातून तब्बल दीड लाख रुपये रस्त्यात पडले होते. ती रक्कम बेळगाव उत्तर रहदारी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वाय. वाय. तळेवाड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ती रक्कम परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वाय. वाय. तळेवाड हे काल शुक्रवारी रात्री शहरात गस्त घालत असताना मोटरसायकलवरून जाणाऱ्या अभिषेक मुचंडी या युवकाच्या खिशातील सुमारे दीड लाख रुपये पैशांचा गट्टा रस्त्यावर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. इतकी मोठी रक्कम रस्त्यात पडलेली पाहिल्यावर एखाद्याचा मोह आवरला नसता परंतु त्यांनी तसे न करता ते पैसे आपल्या ताब्यात घेऊन सदर तरुणाचा पत्ता शोधून काढला व ते पैसे अभिषेक मुचंडी यांचेच आहेत याची शहानिशा करून त्यांच्याकडे सुखरूप सुपूर्द केले. वाय. वाय. तळेवाडकर यांच्या या कृतीतून त्यांनी आपली आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपली हरवलेली रक्कम सुखरूप परत मिळाल्यामुळे अभिषेक यांनी कृतज्ञता व्यक्त करून वाय. वाय. तळेवाडकर यांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta