

बेळगाव : बेळगाव शहरातील अनगोळ नाका येथे महानगरपालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एल अँड टी कंपनीने उभारलेल्या भव्य पाण्याच्या टाकीला पाणी सोडण्यापूर्वीच गळती लागल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.
ही पाण्याची टाकी बांधून एक वर्ष उलटले असतानाच गळती लागल्याने, संपूर्ण प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या टाकीतून परिसरातील नागरिकांना अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही, मात्र काल या टाकीला गळती लागल्याचे निदर्शनास आले. तातडीने एल अँड टी कंपनीचे कामगार हे गळतीचे पॅचवर्क करताना आज दिसून आले. गळती लागलेल्या ठिकाणी पॅचवर्क सुरू असताना टाकीच्या बांधकामात झाडांची मुळे सुद्धा स्पष्टपणे दिसत आहेत. यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करत आहेत. काम सुरू नसतानाच टाकीची अशी अवस्था झाल्यामुळे, परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत महानगरपालिकेने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta