

बेळगाव : कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंत बाळेकुंद्रीतील पंत महाराजांच्या १२० व्या पुण्यतिथी उत्सवाला बुधवारी सकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात भक्तीभावाने प्रारंभ झाला.
बुधवारी सकाळी ८ वाजता समादेवी गल्लीतील पंतवाड्यातून प्रेमध्वज मिरवणूकीला प्रारंभ झाला. प्रारंभी सकाळी पंथ महाराजांचे वंशज परमपूज्य रंजन पंत-बाळेकुंद्री यांच्या हस्ते महाराजांच्या भव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दत्तांच्या आरतीला प्रारंभ झाला. यमुनाक्का भजनी मंडळाच्या महिलानी प्रेम ध्वजाची आरती म्हटली. याप्रसंगी संजीव पंत-बाळेकुंद्री, अध्यक्ष राजन पंत-बाळेकुंद्री, डॉ. संजय पंत बाळेकुंद्री, अभिजीत पंत-बाळेकुंद्री, रूपा पंत-बाळेकुंद्री, सुखदा पंत बाळेकुंद्री, अनघा पंत-बाळेकुंद्री, रेखा पंत-बाळेकुंद्री, अनंत किल्लेकर, डॉ. महेंद्र राणे, भरत सायनेकर, भूषण सायनेकर, वैभव सायनेकर, अवधूत सायनेकर, सुनंदाताई किल्लेकर, अथर्व किलेकर, सुषमा सायनेकर, गीता पाटील, लता जमखंडीकर आदी हजारो भक्त उपस्थित होते. ही मिरवणूक खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, बसवान गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, फोर्ट रोड, किल्ला मार्गे गांधीनगर पुढे साबंरा रोडला मिरवणूक मार्गस्थ झाली.ही मिरवणूक सांबरामार्गे दुपारी २ पर्यंत पंत बाळेकुंद्रीतील वाड्यात पोचली. सायंकाळी ५ वाजता बाळेकुंद्रीतील पंतवाड्यातून प्रेमध्वज मिरवणूक निघून रात्री ८ वाजता मंदिरस्थळी दाखल झाली. प्रेम ध्वजारोहण झाल्यानंतर उत्सवाला प्रारंभ झाला. गुरुवार दि. ९ पहाटे ५ वाजता श्रींचा पुण्यस्मरण कार्यक्रम होणार आहे. सकाळी ७ वा. श्रींची पालखी गावातील श्रींच्या वाड्यातून निघणार असून दुपारी २ वाजता आमराईतील श्रीपंत स्थानी दाखल होणार आहे. तर रात्री ८ ते १२ या वेळेत पालखी सेवा होणार आहे. शुक्रवार दि. १० दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत प्रेमानंद टिपरी कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ वाजता श्रींची पालखी आमराईत दाखल होणार असून त्यानंतर गावातील वाड्यात पोचून उत्सवाची सांगता होणार आहे.
पंत महाराज पुण्यतिथीनिमित्त कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथील हजारो भाविक पंत बाळेकुंद्रीत येतात. या भाविकांच्या सोयीसाठी बेळगाव शहर बसस्थानकातून अतिरिक्त बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा तीन दिवस चालणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाने एका पत्रकाद्वारे केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta