
बेळगाव : बेळगाव शहरालगत असलेल्या भूतरामनहट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा लघु प्राणी संग्रहालयात तब्बल 28 हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत हरणांचा आकडा मोठा असल्याने प्राणी संग्रहालयातील वातावरण सध्या चिंताजनक बनले आहे. हरणांच्या मृत्यूचे कारण संसर्गजन्य असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. सदर हरणांचा मृत्यू एखाद्या जिवाणूच्या संसर्गामुळे झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अकस्मातरीत्या इतक्या मोठ्या प्रमाणात हरणांचा मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री ईश्वर खंडरे यांच्यापर्यंत पोहोचतात या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी वनविभागाला दिले आहेत. उपलब्ध माहितीनुसार जिवाणूच्या संसर्गामुळे हरणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशु वैद्यकांनी वर्तविला आहे. नेमका कोणत्या प्रकारचा संसर्ग झाला हे शोधण्यासाठी म्हैसूर आणि बन्नेरघट्टा येथील तज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक आज बेळगाव येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात दाखल होत आहे.
एसीएफ नागराज यांनी सांगितले आहे की, मृत हरिनांचे मरणोत्तर परीक्षण करून पुढील तपासासाठी नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. सुरुवातीला 8 हरणांचा मृत्यू झाल्यानंतरच म्हैसूरच्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या होत्या. सद्यस्थितीत अन्य इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी पवन करनिंग यांच्याकडून योग्य आणि त्वरित माहिती मिळत नसल्यामुळे प्रशासन आणि वन विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्यामुळे उर्वरित प्राण्यांची काळजी घेणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
Belgaum Varta Belgaum Varta