
बेळगाव : बेळगाव येथे होत असलेल्या कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाला प्रतिउत्तर देण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत विचार विनिमय करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवार दिनांक २२ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे आयोजित करण्यात आली आहे.
वादग्रस्त सीमाप्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटक सरकारने बेळगाव येथे २००६ पासून कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन घेण्याची सुरुवात केली आहे. तसेच बेळगाव येथे सुवर्णसौध बांधून मराठी भाषिकांवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. या सुवर्णसौध येथे प्रतिवर्षी कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होत असते. या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवार दिनांक ८ डिसेंबर रोजी होणारा महामेळावा यशस्वी करण्यासाठी ही व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, युवा आघाडी व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर, विठ्ठल पाटील, मोनाप्पा पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta