
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन शेतकऱ्यांच्या बांधावर
बेळगाव : उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आज जिल्हाधिकारी कामाची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व आपण विकासाचे विरोधक नसून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कायदेशीररित्या काम सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

उच्च न्यायालयाचा आदेश लागू झाल्यानंतर हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यानी कामाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला व आम्हाला विश्वासात न घेता अनाधिकृतपणे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हे काम तात्काळ रद्द करावे अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली. 1930 मध्ये कॅम्प परिसरातील फिश मार्केटमध्ये झिरो पॉईंट निश्चित करण्यात आला होता पण आता तो अलारवाड येथे हलविण्यात आला आहे ही बाब शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करू नये अशी विनंती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली असता उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतरच या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी शेतकरी नेते प्रकाश नाईक म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी रस्त्यासाठी घेऊन दीड लाख शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचे काम सरकारद्वारे सुरू आहे. कन्नड -मराठी वाद निर्माण करून शेतकऱ्यांची एक प्रकारे हत्या करण्याचा कट प्रशासन रचत आहे. अधिवेशनाच्या काळात इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये यासाठी जिल्हाधिकारी या ठिकाणी आले आहेत. घटप्रभा डावा कालवा व उजवा कालवा बांधकामावेळी शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले असता सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या, त्याचप्रमाणे हलगा -मच्छे बायपास रस्त्याबाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आम्ही विकासाचे विरोधक नाही परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच विकास कामे करण्यात यावी असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, 2011 मध्ये जे सर्वेक्षण झाले ते योग्य नव्हते ते पुन्हा एकदा करण्यात येईल. येळ्ळूर, वडगाव, शहापूर रस्ते विकास कामादरम्यान पाणी शेतात शिरणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच बायपास बांधकाम सुरू करण्यात आले असून याबाबत दिवाणी न्यायालयात केस प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधी योग्य कागदपत्रांची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ती त्यांना पुरवली जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी येळ्ळूर – वडगाव बेळ्ळारी पुलाला भेट दिली व बेळ्ळारी नाल्याच्या सद्यस्थितीची पाहणी केली. यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांनी बेळ्ळारी नाला अस्वच्छ असून त्यात गवत व जलपर्णी वाढल्यामुळे नाल्याची रुंदी व खोली कमी झाली आहे, त्यामुळे नाल्यातील गाळ काढून त्याची खोली वाढविण्यात यावी अशी मागणी केली. बेळ्ळारी नाला स्वच्छ करण्यासाठी विशेष निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते ते पूर्ण करावे अशी मागणी देखील यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी केली. यावेळी शेतकरी नेते व परिसरातील शेतकरी आणि संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta