
बेळगाव : दिनांक आठ डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते या महामेळाव्यासंबंधी पोलीस खाते व प्रशासन यांच्याकडे परवानगीसाठी रितसर अर्ज करण्यात आला होता. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मेळावा कोठे घ्यावा यासाठी काही ठिकाणे देण्यात आली होती. या ठिकाणांपैकी एका ठिकाणी परवानगी द्यावी अशी विनंती ही करण्यात आली होती या पत्रानुसार पोलीस खात्याबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. या बैठकीतील चर्चेनुसार मेळावा व्हॅक्सिन डेपो येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी बेळगाव आणि परिसरातील जनतेने प्रतिसाद देऊन व्हॅक्सिन डेपोकडे मोठ्या प्रमाणात येणे सुरू केल्यावर व्हॅक्सिन डेपोच्या चारी बाजूने पोलिसांकडून रस्ते बंद करण्यात आले. 11 च्या सुमारास तेथे येणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अटक करून एपीएमसी येथील रयत भावनात त्यांना ठेवण्यात आले. अनेक कार्यकर्त्यांना माघारी जाण्याची विनंती करून पोलिसांनी दडपशाहीने मेळावा घेऊ दिला नाही परंतु रयत भवन येथेच जमलेल्या कार्यकर्त्यानी सभेचे आयोजन करून मराठी भाषिकांचा निर्धार व्यक्त केला. या सभेत कर्नाटक सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करून सीमा प्रदेशाचा महाराष्ट्रात समावेश करावा. भाषिक अल्पसंख्यांकांचे अधिकार त्यांना मिळावेत केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारने भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या विनंती प्रमाणे त्यांना याबाबत काय केले ते कळवावे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यावर खोटे खटले दाखल करण्याचे बंद करावे अशा प्रकारचे ठराव मंजूर करण्यात आले. या मेळाव्यासाठी अटक झालेल्या या मेळाव्यात भाग घेण्यासाठी आलेल्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष, बेळगाव शहर बेळगाव तालुका, खानापूर पदाधिकारी यांच्यावतीने जाहीर आभार मानण्यात येत आहेत. अशाच प्रकारची एकजूट या पुढच्याही आंदोलनात मराठी जनतेने ठेवावी आणि मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी सिद्ध राहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि समितीचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta