
बेळगाव : अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने मंगळवार दिनांक 16 रोजी सुवर्णसौधध नजीक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
चर्मकार समाज आणि चर्मकार उद्योगाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या लीडकर महामंडळात समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. या महामंडळाच्या चेअरमन अथवा संचालक पदी समाजातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात येत नाही. शासनाच्या वतीने चर्मकारांना लघुउद्योगांतर्गत व्यवसाय करण्यासाठी लिडकर शेड उपलब्ध करून देण्यात येतात. गरीब चर्मकार रस्त्याच्या शेजारी शेड स्वरूपात आपला व्यवसाय सुरू करतात. मात्र यासाठी महापालिका परवाना देत नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईची टांगती तलवार गरीब चर्मकारांना नेहमी असते. त्यातच रस्त्याच्या शेजारी ऊन, पाऊस आणि धुळीच्या वातावरणात रस्त्या शेजारी आपला व्यवसाय करणारे गरीब चर्मकारांना आरोग्याच्या समस्या सामोरे जावे लागते. अनेकांचा अकाली मृत्यू होतो. याची दखल घेतली जात नाही.
लोकसेवा आयोगात चर्मकार समाजाला सदस्यत्व देण्यात आलेले नाही. चर्मकार समाज अत्यंत आर्थिक दुर्बल परिस्थितीत आहे. व्यावसायिक स्पर्धेमुळे चर्मकार समाजाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्याचबरोबर बेंगलोर येथील चर्मकार समाजाच्या जागेत शासनाने समुदाय भवन बांधून देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. आदी विविध मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी सकाळी सुवर्णसौध नजिक महासभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील हजारो चर्मकार समाज बांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती महासभेचे अध्यक्ष भीमराव पवार यांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta