
निलजी : रणझुंझार शिक्षण संस्था संचलित रणझुंझार हायस्कूल, निलजी येथे रणझुंझार को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या सौजन्याने कै. वामनराव मोदगेकर स्मृतीदिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन श्री. रमेशराव वामनराव मोदगेकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. आर. सी. मोदगेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विमलताई अशोकराव मोदगेकर व संचालक कु. अमर मोदगेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कै. वामनराव मोदगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक श्री. वसंत गोपाळ पाटील यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षीय भाषणात श्री. रमेशराव मोदगेकर म्हणाले, “पूर्वभागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने गेल्या २३ वर्षांपासून ही व्याख्यानमाला सातत्याने राबविली जात आहे. या उपक्रमाचा लाभ विद्यार्थी घेत आहेत, याचा मला अभिमान आहे.”
प्रमुख पाहुणे श्री. आर. सी. मोदगेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शाळा विनाअनुदानित असली तरी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात आम्ही कधीही मागे राहिलो नाही. शासनाने अशा विनाअनुदानित शाळांना लवकरात लवकर अनुदान द्यावे.”
मराठी विषयाचे व्याख्याते श्री. वाय. के. पाटील यांनी आपल्या मनोगतात विनाअनुदानित शाळा तीस वर्षे यशस्वीपणे चालविणे ही सोपी गोष्ट नसल्याचे नमूद करून, संस्कारक्षम व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या रणझुंझार शिक्षण संस्थेचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रणझुंझार हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. वाय. पी. पावले यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती. एस. व्ही. मुंगारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. एन. व्ही. आपटेकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta