

बेळगाव : गेल्या दहा वर्षांपासून गतिमंद मुलांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण करणाऱ्या कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट स्नेहालय शाळेला संरक्षण मंत्र्यांचा उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून गेल्या दहा वर्षांपासून कॅन्टोन्मेंट स्नेहालयमध्ये गतिमंद विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचे धडे उपलब्ध करून दिले जात आहेत.
२०१४ मध्ये कॅन्टोन्मेंट स्नेहालय शाळेची स्थापना करण्यात आली होती तसेच सुरुवातीपासूनच शाळेत प्रवेश घेतल्या जाणाऱ्या गतिमंद विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विविध प्रकारचे कौशल्यभीमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकडेही सातत्याने लक्ष दिले जात आहे याची दखल राष्ट्रीय पातळीवरील परीक्षण मंडळाने घेत
बेळगाव येथील कॅन्टोन्मेंट स्नेहालय या दिव्यांग मुलांच्या शाळेला, दिव्यांग मुलांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी उत्कृष्ट सेवा आणि समर्पणाबद्दल संरक्षणमंत्र्यांचा उत्कृष्टता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
डिफेन्स दिनाच्या निमित्ताने दिल्ली येथील डिफेन्स इस्टेट भवन मंगळवारी (ता. १६) आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात
संरक्षण मंत्री. राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने माजी सीईओ राजीव कुमार, आरएमओ डॉ. आर. बी. अण्णागोळ आणि कॅन्टोन्मेंट स्नेहालयच्या मुख्याध्यापिका दिपाली नरेश पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार दिव्यांग मुलांना समावेशक शिक्षण, विशेष काळजी आणि सर्वांगीण विकासाच्या संधी प्रदान करण्यासाठी कॅन्टोन्मेंट स्नेहालयच्या अनुकरणीय प्रयत्नांना अधोरेखित करीत असून. हा पुरस्कार संस्थेच्या वचनबद्धतेचा, तिच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांचा आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या सततच्या पाठिंब्याचा पुरावा आहे तसेच बेळगाव कॅन्टोन्मेंट शाळा येणाऱ्या काळात देखील मुलांच्या विकासासाठी अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करील, असे प्रतिपादन पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिपाली पाटील यांनी व्यक्त केले.



Belgaum Varta Belgaum Varta