
बेळगाव : महाराष्ट्र बाहेर विखुरलेल्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी कार्यरत असलेले बृहन महाराष्ट्र मंडळ यावर्षी शतक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. शतक महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या बेळगाव शाखेच्या वतीने बुधवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 5 वाजता कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात भरत नाट्य संशोधन मंदिर पुणे प्रस्तुत तुफान गाजलेल्या ‘हे बंध रेशमाचे’ या तुफान गाजलेल्या संगीत नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती बृहन महाराष्ट्र मंडळाशी संलग्नित असलेल्या मराठी भाषा प्रेमी मंडळाचे कार्यवाह नितीन कपिलेश्वर यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना कपिलेश्वर म्हणाले, महाराष्ट्र बाहेर राहत असलेल्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी, मिलिंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या बृहन महाराष्ट्र महामंडळाचा शतक महोत्सव साजरा केला जात आहे. शतक महोत्सवानिमित्त वर्षभर देशभरातील विविध राज्यातील शाखांतर्फे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अंतर्गत बेळगावात गेल्या सहा महिन्यांपासून कार्यक्रम सुरू आहेत. शतक महोत्सवाच्या निमित्ताने सिद्धहस्त लेखक रणजित देसाई यांच्या हे बंध रेशमाचे या गाजलेल्या संगीत नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. नाटकाच्या प्रारंभी वयाची पंच्याहत्तरी पार केलेल्या 28 सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
भरत नाट्य संशोधन मंदिर पुणे यांच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या हे बंध रेशमाचे या नाटकात बेळगावच्या कलाकार अनुष्का आपटे ही अभिनय सादर करणार आहेत. या नाटकाचे विनामूल्य पासेस टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य मंदिर तसेच लोकमान्य रंगमंदिरात रसिकांसाठी उपलब्ध आहेत. पुढील काळातही बेळगाव शाखेच्या वतीने शतक महोत्सवी वर्षात विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असेही कपिलेश्वर यांनी सांगितले. यावेळी कुमार पाटील, परशुराम माळी, नीता कुलकर्णी आदी सदस्य हे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta