
बेळगाव : मुचंडी (ता. जि. बेळगाव) येथील आंतरराष्ट्रीय मल्ल पै. अतुल सुरेश शिरोळे यांची मलेशिया येथील क्वालालंपूरमध्ये येत्या 12 ते 17 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा–2026 साठी भारतीय कुस्ती संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
क्वालालंपूर येथे होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्प संघटना समिती तसेच वर्ल्ड फेडरेशन ऑफ मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन (MOGA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. राज्य व राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमधील अतुल शिरोळे यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे, तसेच स्टेट मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन यांच्या शिफारशीनुसार आणि MOGA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची भारतीय कुस्ती संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पै. अतुल शिरोळे यांनी स्थानिक कुस्ती मैदानांपासून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत मोठा नावलौकिक मिळविला आहे. शिरोळे कुटुंबाला कुस्तीची परंपरा लाभलेली असून, अतुल यांचे आजोबा कै. पै. गुंडू शिरोळे हे प्रसिद्ध मल्ल होते. तसेच अतुल यांचे वडील पै. सुरेश शिरोळे हेही एकेकाळचे नामांकित पैलवान होते.
या नियुक्तीबद्दल पै. अतुल शिरोळे यांचे कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta