बेळगाव कोका न्यायालयाचा निर्णय
बेळगाव : कुख्यात डॉन बनंजे राजा याला अंकोल्याचे उद्योजक अन भाजप नेते आर. एन. नायक यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेळगाव येथील कोका न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली. ३ कोटी रुपयांची सुपारी घेऊन उद्योजक आर. एन. नायक यांची २१ डिसेंबर २०१३ रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या आरोपाखाली बनंजे राजासह एकूण ९ आरोपीना बेळगाव येथील कोका न्यायालयाने नुकतेच दोषी ठरवून ४ एप्रिल रोजी शिक्षा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या सर्व ९ आरोपीना आज कोका न्यायालयाने शिक्षा सुनावली. बनंजे राजा याच्यासह ४ आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेळगावचे प्रथम मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच कोका न्यायालयाचे न्या. चंद्रशेखर जोशी यांनी आज ही शिक्षा सुनावली. यावेळी न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
